मोहनदास करमचंद गांधी तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सस्नेह साष्टांग दंडवत. आज भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना तुमच्या जयंती दिनी तुम्हाला पत्र लिहावे असे वाटले म्हणून पत्र लिहित आहे. खरेतर वर्तमानातकाळात पत्र लिहिणे जवळजवळ थांबलेच आहे. मनाला पत्र लिहावे असे वाटत असले तरी त्या पत्रातून भावना पोहचतील का? अशी शंकेची पाल मनाला चाटून जाते. खरेतर पत्र यासाठी लिहावे वाटते आहे की, तुमच्या अपार कष्टाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळविताना भविष्या संदर्भाने तुम्ही काही स्वप्न तुम्ही पाहिले होते. तुमच्या मृत्यूनंतरही देशाचा कारभार सुरू आहे. देशाने केलेली भौतिक प्रगती तोंडात बोट घालावी इतकी आश्चर्यकारक आहे. मात्र या प्रगतीत आणि माणसांच्या अंतःकरणात तुम्ही पेरलेल्या विचाराचे दर्शन मात्र अभावाने घडते आहे. तुमच्या वाटेने चालावे असे सांगणे हे आदर्शाचे आणि कठीण वाटू लागले आहे. तुमचे विचार कथन करणे हा केवळ उपचार ठरत आहे. तुमच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी तुमचे स्मरण आम्ही करत आहोतच. समाजातील सद्सद्विवेकाच्या मार्गाने जाणारी काही माणसे अजूनही जिवंत आहेत. ते तुमच्याच वाटेने चालणे पसंत करीत आहेत. त्यांना नेहमीच वाटते तुमची वाट ही समाजाचे, राष्ट्राचे आणि जगाचे भले करणारी आहे. त्यामुळे त्या सज्जनांचा धाक आहे म्हणून तुमच्या प्रतिमाचे पूजन करीत काहींना प्रवास सुरू ठेवावा लागतो. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यातही सज्जनतेसाठी सतत चालत राहिलात. तुम्हांला अवघे जग ओळखत असताना देखील तुमच्या मनात सत्तेचा मोह निर्माण झाला नाही याचेच फारच आश्चर्य वाटते.
तुमच्या नंतर देशात बरेच काही घडते आहे. वर्तमानातील हरवेलेली माणसं.. मूल्यांचा शोध घेताना अंधुक झालेली वाट. तत्वासाठी जीवन व्यतीत करणारी माणसं. देशासाठी बलिदान करणारी तरूणाई.. सामान्यांमध्ये माणूस पाहणारी, ईश्वराचे रूप अऩुभवनारी तुमच्यासारखी माणसं आता फारशी दिसत नाही. भोवताल गर्दीने गच्च झाला आहे. पण तो साराच मुखवट्यांनी भरलेला. त्यात चेहराच सापडत नाही. मग हरवलेली माणसं शोधताना तुमच्या भिंतीवरील फोटोकडे एकटक नजर लावून स्वतःलाच शोधत रहावे लागते. आज तुमचे नाव घेत आम्ही काहीही करण्यास मोकळे आहोत का? असा प्रश्न पडतो. तुम्ही जीवनभर सत्याचा आग्रह धरला. ज्या इंग्रज सत्तेला धक्का लावणे अवघड होते त्या सत्तेला खिळखिळे करण्यासाठी तुम्ही सत्याग्रहाचे शस्त्र काढले. त्या शस्त्राच्याद्वारे खरेच स्वातंत्र्य मिळेल का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेकांनी तुमच्या या युध्द शस्त्राची टिंगल टवाळी केली. मात्र तुम्ही तुमच्या निर्णय आणि विचारांपासून कधीच विचलित झाला नाही. तुम्हांला समाज परिवर्तनासाठी आणि स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धगधगता ठेवण्यासाठी सत्याची कास धरावी वाटली याचेच फार आश्चर्य वाटते. आपण सत्याशी कधीच तडजोड केली नाही. सत्यात एवढी ताकद असते हे तुमच्या जीवन चरित्राकडे पाहून सतत अनुभवास येते. आज सत्यालाच प्रश्न पडावा अशी परीस्थिती आहे. भोवतालमध्ये सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर बर्याच प्रयत्नांनतरही सापडणे कठीण बनत जाते. सत्याची वाट चालून सत्ता मिळत नाही म्हटल्यावर हवे त्या मार्गाने प्रयत्न करीत राहाणे आणि सत्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करून सत्तेचे पाईक होण्यात कितीतरी आऩंद वाटू लागला आहे. सत्याला दूर सारत सत्तेचे सोपान चढताना आपण सत्याची प्रतारणा करीत असल्याची भावना होत असली तरी वर्तमानात सत्ताच महत्वाची बनली आहे. त्यामुळे तुमचा फोटे समोर ठेवत सत्ता उपभोगत वाट चालणे सुरू आहे. तुम्ही आमच्या अवतीभोवती आहातच. सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होताना सामान्यांना थापा मारत आणि त्यांच्या भावनांना हात घालत प्रवास सुरू आहे. गांधी आम्ही तुमचे स्मरण करीतच सत्ता भोगत आहोत.
तुम्हाला आम्ही विसरलो नाहीत बरं का! फक्त काय तर तुमच्या सत्य तत्वापासून बाजूला गेलो इतकेच. तुम्ही देशाला स्वातंत्र्य मिळून देताना जो संघर्ष केला. तो आम्ही देखील करत आहोत. मात्र तुम्ही सत्यासाठी केला आणि आम्ही सत्तेसाठी करतो आहोत काय तो एवढाच फरक. अन्यायाच्या विरोधातील लढाई सुरूच आहे. अन्यायाच्या व्याख्येत मात्र फरक पडला आहे. त्या संघर्षात फक्त त्यात तुमचा स्वार्थ नव्हता. आम्हाला आता त्या वाटांवरून चालून कसे चालेल? आता देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे थोडेसे ध्येय बाजूला सारत आमची ध्येय साध्य करण्याचे प्रयत्न करीत आहोत. म्हणून गांधीजी तुम्हाला आम्ही विसरलो असे अजिबात मानू नका हं. तुमच्या वाटेचा प्रवास सुरू ठेवला आहे फक्त विचार आणि तत्व सोडून इतकेच.
इंग्रज राजसत्तेला दूर सारण्यासाठी तुम्ही अहिंसाचे तत्व पाळले. त्या तत्वाची वाट चालताना तुम्ही पराकोटीचे अहिंसावादी झालात. संघर्षासाठी कोणावर हल्ला करणे नाही, कुणाचे मन दुखवणे नाही, कोणाचे काही घेणे नाही. वाईट पाहणे नाही, वाईट बोलणे नाही असं बरंच काही सांगितलं होतं. तुमच्या तर माकडांची आम्हांला सतत आठवण येते. पण ती माकडे आज समाजात दिसत नाही. सारेच कसे मुखवटे लावलेली माणसं आपल्या भोवती दिसत आहेत. सोबत राहूनही कोणाचा गळा केसाने केव्हा कापतील याचाही नेम राहिला नाही. तुमच्या मनात तर प्रचंड भूतदया साठवलेली होती. तुम्ही माणसांसारखेच प्रेम त्या पशुपक्ष्यांवरती करत गेलात. आज आम्ही प्राण्यांवर सोडा. माणसांवर देखील प्रेम करेणासे झाले आहोत. दिवसाढवळ्या माणसांवर होणारे हल्ले, सत्तेच्या मशगुलीत रमण्यासाठी स्वतःच्याच माणसांचा बळी देताना मनाला कसल्याच वेदना होत नाही. जाती भेदाचे, धर्म भेदाचे संघर्ष उभे करीत माणसं कापली जात आहेत. मनामनात हिंसेचे काहूर कोठून येते? असा प्रश्न पडतो. तुमच्यावरती अनेक खटले चालले, अटक झाली. प्रतिबंध करण्यासाठी इंग्रजानी अनेक प्रयत्न केले मात्र तुमच्या मनात कधीच हिंसेने घर केले नाही. तुम्हांला हे कसे जमते? हा खरा प्रश्न आहे. ते परदेशी होते तरी तुम्ही हात उचलला नाही येथे तर रोजच आपल्याच बांधवावर हात उचलला जातो आहे. गोळ्या घालाव्या वाटल्या तर त्याही घातल्या जात आहेत. आज अहिंसा सांगण्यापुरतीच राहिली आहे. सांगणार्यालाही स्वतःबद्दलच्या अंहिसेची शंका यावी अशी स्थिती आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात तुम्ही जीवाचे रान करून सामान्य माणसांच्या मनात स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटता ठेवला. ज्या राजसत्तेच्या मस्तकावरील सत्तेचा सूर्य मावळत नव्हता. त्यांना तुम्ही पुन्हा त्यांच्या देशात घालविण्यासाठी जनसामान्यांच्या हाती अहिंसेचे शस्त्र देऊन परत पाठविले. तुम्ही नैतिकतेशी तडजोड न करता संघर्ष करीत राहिला. जातीभेदाच्या भिंती संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही सातत्याने कष्टत राहिलात. धर्माचा विचार मस्तकी घेताना त्या विचाराच्या केंद्रस्थानी माणूस होता. तुम्ही जेव्हा जेव्हा माणसांना नाकारणारी व्यवस्था धर्म स्वीकारत होता तेव्हा तेव्हा तुम्ही धर्म नाकारण्याइतके धाडस दाखविले होते. गांधीजी तुमच्या प्रत्येक आंदोलनात राष्ट्र जसे होते त्याप्रमाणे अस्पृश्यता संपुष्टात आणण्यासाठीची दृष्टी होती. आपण सत्याग्रहाला निघाला तरी गावोगावी रस्त्यात दलिताच्या वस्तीत जात होता. तेथे जाऊन अंघोळ करीत होता. सभेला इतरांनी यावे म्हणून जसे प्रयत्न होत होते त्याप्रमाणे दलितांनी देखील यावे यासाठी आग्रही राहत होता. जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी आपण माणूसपण पेरत गेलात. आश्रमात दलित जोडपे ठेवले म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्ती केली. अऩेकांनी आश्रम सोडून जाण्याची धमकी दिली. काहींनी तर आश्रमाला मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा देखील दिला. आपणाला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न झाले मात्र आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता दलितांच्या बाजून उभे राहत. सर्व निघून गेले आणि निधी नाही दिला तरी ते दलित जोडपे आश्रमातच राहील असा ठाम विश्वास दाखविला. आपण तत्वासाठी, सत्यासाठी जगाच्या विरोधात उभे राहत होता. एवढी शक्ती नेमकी येते कोठून असा प्रश्न पडावा असे वर्तमान आहे. आम्ही तर तत्वाला कधीच तिंलाजली दिली आहे. प्रत्यक्ष जीवन व्यवहारात उपयोजन करतांना तत्वे दिसत नाही आणि आता तत्वे सांगावित आणि कोणी ऐकावी अशी स्थिची उरली नाही. तत्वाची पाऊलवाटेने चालणारी माणसं वेडी ठरावित अशी स्थिती आहे.
आपण जनतेचा पैसा आहे म्हणून तो जपूण वापरला पाहिजे असे म्हणत होता. आश्रमात जेवनासाठी बाजारात जे स्वस्त असेल ते आणत होता. जिभेचे चोचले नाही तर केवळ भूक भागविण्याचा प्रयत्न केला जात होता. अनेकदा भोपळ्याची भाजी खाऊन लोक कंटाळले होते. अशावेळी आश्रमातील आपले सहकारी टीका करीत असत, पण आपण जनतेचा पैशाचा विनियोग अधिक उत्तम करण्याची गरज व्यक्त करीत होता. आपण फक्त विश्वस्त आहोत ही तुमची धारणा. संपत्ती अथवा पैशांवर आपला हक्क अथवा मालकी नाही असे तुम्ही सांगत असे. किती निरपेक्षतेने आपण जीवन जगत होता. आपल्याला कधीच परीग्रह करण्याचा मोह झाला नाही का? आपण आफ्रिकेत असताना तेथील नेतृत्व करताना अनेकांशी बंध जुळले होते. तेथील जबाबदारी पार पाडल्यानंतर आपणाला अनेकांनी अत्यंत महागड्या भेटी दिल्या होत्या. पण आपण त्या भेटी न स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय पाहिल्यावर तुम्ही खरच संत होता. तुम्ही जनतेच्या पैशांची केलेली जपवणूक पाहिल्यावर ही निरपेक्षता वर्तमानात का दिसत नाही हा प्रश्न छळत राहतो. आता आपल्या देशात निवडणुका म्हणजे पैशांचा बाजार झाला आहे. पैसा देऊन माणसं विकत घेता येतात ही भावना दिवंसेदिवस वाढत चालली आहे.त् यामुळे मत विकत घेणे, त्या जोरावरती विजयी होणे यात काहीच अनैतिक नसते. लोकशाही व्यवस्थेत सामान्यांना सन्मानाने जगण्याच्या वाटा निर्माण करायच्या असतात. त्या आता अशी माणसं विकत घेऊन खरच करता येतील का? राजकीय पक्षांच्या निधीमध्ये कोटी रूपयांचा गोळा होणारा निधी पाहिला की, आपण निरपेक्षताचा पेरलेला विचार येथे रूजायचा राहून गेला. आपले जीवन अपरिग्रहाने भरलेले होते. एक पंचा हीच आपली संपत्ती होती पण त्यापेक्षा गांधीजी तुमच्याकडे तत्वाची असलेली श्रीमंती अधिक महत्वाची वाटते. तुमच्या श्रीमंतीचा विचार घेऊन पाऊलवाटा चालत राहिलो असतो तर आपला प्रवास पुढे गेला असता. आज आम्ही पैशांची, इमारतीची आणि उद्योगाची श्रीमंती प्राप्त केली आहे. पण ती श्रीमंती उपभोगण्यासाठी माणसांच्या विचाराच्या आणि तत्वांच्या श्रीमंतीला लागलेली उतरती कळा अधिक चिंताजनक वाटते. तुम्ही सतत देश व समाजाकरीता राबत असतांना कधी धर्म म्हणून माणंसाकडे पाहिले नाही, मात्र जेव्हा केव्हा तुम्ही हिंदूच्या कडे गेला तेव्हा त्यांना तुम्ही मुस्लिमांचे हितचिंतक वाटलेत. जेव्हा मुस्लिमाकडे गेले तेव्हा तुम्ही त्यांना हिंदूंचे वाटले.
तेव्हा प्रत्येक अशांत परिस्थितीत शांतता निर्माण करण्यासाठी स्वतःचा जीव संकटात घालून चालत होता. तेव्हा तुमच्या वाट्याला अनेकदा अपमान आहे. कोणी तरी म्हणायचे आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका हवे तर तुम्ही हिमालयात जा. तेव्हा तुम्ही अत्यंत शांततेने उत्तर देत होते की मी हिमालयातही गेलो असतो पण माझा देव म्हणजे सामान्य माणसं तिथे नाही. तुमचे हे अपमान गिळणे आणि माणसांत देवत्व पाहणे खूपच भावत जाते. पण ही वृत्ती येथे कोठून या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही. आज अशी शमविणारी माणसं समाजातून हद्दपार झाली आहे. सर्व धर्म समभावाचा दृष्टीकोन दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या जातीचा, आपल्या धर्माच्या लोकांचा नेता झाला आहे. आणि प्रत्येकाला आपला धर्म प्रिय वाटू लागला आहे. गांधीजी तुम्हांला नाही का अशा एका धर्माची बाजू घेऊन चालावे वाटले. तुम्हाला तर सर्वच धर्माच्या गर्दीत माणसं वाटत होती. तुम्ही मात्र काही लोकांना काही लोकांचे नेते वाटत होते. किती हा विरोधाभास ना..?
खरेतर गांधी नावाचा माणूस समग्र जीवन प्रवासात केवळ तत्वाच्या वाटेने चालत राहिला. ज्यांना या तत्वाचा प्रवास स्वार्थाच्या आड येत गेला त्यांनी तुमच्या विचाराकडे स्वार्थाच्या चष्म्यातून पाहिले. त्यामुळे तुमच्या निर्मळ विचारातही त्यांना द्वेषाची किनार दिसली. त्यात तुमच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तुम्ही मरण पावला तरी पण तुमची हत्या, खून0, वध असे शब्दप्रयोग करीत तुमच्या माणूसपणाच्या विचाराचा द्वेष करीत राहिलो. आम्हांला तुम्हांला विचारांसह स्वीकारता आले नाही हे मात्र खरे. गांधीजी आपल्याच देशात तुमचे विचार पराभूत होताना पाहताना आणि पराभूत करणारे पाहताना काहीशी मान शरमेने खाली जाते. त्याचवेळी मात्र जगात तुमच्या विचाराला वंदन करणारी माणसं पाहिली की हृदय भरून येते आणि आपण भारतीय आहोत याचा अभिमानही वाटतो. गांधीजी माफ करा.. जरा जास्त लिहिले आहे.. राहवले नाही.. मनात खूप दिवसाची खदखद होतीच.. म्हणून व्यक्त झालो आहे. मला माफ कराल.. बरेच काही लिहिले आहे...!
- संदीप वाकचौरे, संगमनेर

खुप छान जय हिंद सर
ReplyDelete