ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला
AUS vs NZ-world cup 2023 : ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर 389 धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले. पण न्यूझीलंडला 9 गड्यांच्या मोबदल्यात 383 धावाच करता आल्या. धरमशाला येथे झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ५ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा चौथा विजय ठरला.
AUS vs NZ-world cup 2023 : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि डेव्हिड वॉर्नरच्या 81 धावांच्या जोरावर 49.2 षटकात 388 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी लहान पण कमी चेंडूंमध्ये जास्त धावा केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली.
AUS vs NZ-world cup 2023 : विजयाचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने समाधानकारक सुरुवात केली. पण त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्या. रचिन रवींद्रने 89 चेंडूत 116 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. याशिवाय डॅरिल मिशेलने 51 चेंडूत 54 धावा केल्या. सर्व विश्वासार्ह फलंदाज बाद झाल्यानंतर जेम्स नीशमने अंतिम षटकापर्यंत न्यूझीलंडच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याने 39 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. मात्र निशमची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो धावबाद झाला.
AUS vs NZ-world cup 2023 : न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत दोन विकेट्स शिल्लक असताना 32 धावांची गरज होती. हेजलवूडने 49व्या षटकात 13 धावा दिल्या. न्यूझीलंडला 6 चेंडूत 19 धावा हव्या होत्या आणि गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा अनुभवी मिचेल स्टार्क होता. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर स्टार्कने दुसऱ्या चेंडूवर वाईड मारला, त्यालाही चौकार लागला. आता 5 चेंडूत 13 असे समीकरण झाले होते.
AUS vs NZ-world cup 2023 : निशमने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर 2-2 धावा केल्या. आता विजयाचे समीकरण 2 चेंडूत 7 असे होते. पाचव्या चेंडूवर दुसरी धाव घेत असताना निशम बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर फर्ग्युसनला चेंडू सीमापार पाठवता आला नाही. या सामन्यात दोन्ही संघांनी 771 धावा केल्या.
