जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी बंटी जहागीरदार यांचा कोणताही संबंध नाही; नगरसेवक रईस जहागीरदार यांचा दावा
न्यायालयाचा हवाला आणि मंत्र्यांवर आरोप
रईस जहागीरदार यांनी सांगितले की, १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यात जर्मन बेकरी स्फोट झाला होता. या प्रकरणात अन्य सात आरोपींची नावे समोर आली होती, परंतु बंटी जहागीरदार यांचे नाव बदनामीच्या उद्देशाने यात गोवण्यात आले. १ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने बंटी जहागीरदार यांच्याविरुद्ध प्राथमिकदृष्ट्या कोणतेही पुरावे नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पोलीस कार्यक्रमात बंटी जहागीरदार यांचा उल्लेख बॉम्बस्फोटातील आरोपी असा करणे चुकीचे असून, ते चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे रईस यांनी म्हटले.
हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाट?
बंटी जहागीरदार यांच्या हत्येप्रकरणी रईस जहागीरदार यांनी गंभीर आरोप केले आहेत. "सागर उर्फ चन्या बेग, आकाश उर्फ टिप्या बेग आणि सोनू उर्फ जयप्रकाश बेग हेच या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत. उलट हे आरोपी उघडपणे राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत," असा दावा त्यांनी केला. पोलीस तपासात कोणतीही प्रगती नसून, हत्येसाठी वापरलेले हत्यार व वाहन अद्याप जप्त करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
फायली जाळल्याचा आरोप व आंदोलनाचा इशारा
यावेळी नगरसेवक मुझफ्फर शेख यांनी आरोपींशी संबंधित पोलीस ठाण्यातील फायली जाळल्या गेल्याचा धक्कादायक आरोप केला. "पोलिसांवर बाह्य शक्तींचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे या हत्येचा तपास 'एसआयटी'कडे (SIT) देण्यात यावा," अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेणार असून, न्याय न मिळाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेख यांनी दिला.

