पाडळी ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेच्या
आवारात धरणे आंदोलन
- दारूबंदी गावात ग्रामसभेमध्ये विषय क्र. 15 बियर बार, दारू विक्रीचा ठराव रद्द करण्याची मागणी
- ग्रामसभेमध्ये पाडळी गावातील ग्रामस्थांना अंधारात ठेवून विषय मंजूर करून घेतला असल्याचा आरोप
ग्रामपंचायत पाडळीच्या २५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये विषय क्रमांक १५ अंतर्गत गणेश शेषराव कचरे यांच्या अर्जावर त्यांच्या मालकीच्या गट नंबर ६५ मधील हॉटेल सूर्या येथे परमिट रूम बियर बार सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देणारा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र हा ठराव ग्रामपंचायतीच्या कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य दिलीप कचरे, माजी सरपंच बाजीराव गर्जे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, वामन तांदळे, सदस्य उद्धव गर्जे, अंकुश ढाकणे, जिनप्पा फुलमाळी, रमेश कचरे, पांडुरंग काळे, सविता काळे, लताबाई कचरे, रामदास भिसे, प्रवीण गर्जे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दारू विक्रीसंबंधी कोणताही ठराव मंजूर करण्यापूर्वी महिला ग्रामसभेची संमती घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. मात्र अशी महिला ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. तसेच ठरावाचा विषय विषयपत्रिकेत स्पष्टपणे नमूद न करता तो ऐनवेळी मांडण्यात आला, ज्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली. ठरावाचा रेकॉर्डिंगदेखील करण्यात आलेले नाही.
याशिवाय सरपंच अशोक चंद्रकांत गरजे यांनी सभेचे अध्यक्ष असताना ठरावास अनुमोदन दिले, जे नियमबाह्य आहे. ठरावातील अर्जदार गणेश शेषराव कचरे हे स्वतः उपसरपंच असल्याने सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे ग्रामपंचायतीचा ठराव बेकायदेशीर असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले असून, दारूबंदीचे पूर्वीचे ठराव अद्याप लागू असतानाही बियर बारसाठी मंजुरी देणे ही गावाच्या हिताची प्रतारणा असल्याचे म्हटले आहे.
ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, या बेकायदेशीर ठरावाची चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, जबाबदार पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी आणि दारूबंदी कायम ठेवून गावातील शांतता व सामाजिक वातावरण अबाधित ठेवावे.
