नगर : सध्या अनेक कारणांनी समाजमन असंवेदनशील होत चालले आहे. स्नेहालय सारख्या संस्थांमध्ये आल्यावर मात्र समाजभान पुनश्च जागृत आणि कृतिशील होते ,असे प्रतिपादन इमर्सन कंपनीचे उपाध्यक्ष अजय सावरगावकर यांनी केले. पुणे येथील रोटरी क्लब ऑफ पुणे हिल साईड आणि इमर्सन कंपनी यांनी स्नेहालय संस्थेत विद्यार्थ्यांसाठी प्रगत संगणक प्रशिक्षण केंद्र साकारले. मुलांचा स्नेहस्पर्श छात्रावास आणि मुलींचे पुनर्वसन संकुल येथे 42 संगणक संचांसह हे केंद्र सुरू करण्यात आले.
इमर्सन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हिल साईड यांनी फर्निचरसह संगणक प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सर्वसाधारणांची पूर्तता केली. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब पुणे हिल साईडचे अध्यक्ष राजेंद्र म्हेत्रे, पुणे येथील रोटरी क्लब ( क्रमांक 3131 चे)प्रांतपाल संतोष मराठे, मराठवाडा आणि अहिल्यानगर येथील रोटरी क्लब (क्रमांक 3132 चे) प्रांतपाल सुधीर लातुरे , इमर्सन कंपनीचे संचालक रो.अभय बनसोड, हिलसाईड रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख संतोष होनकरपे आणि सचिव चंद्रशेखर महामुनी, स्नेहालय संस्थेचे मुख्य पालक रो.राजीव गुजर, सचिव डॉ. प्रीती भोम्बे आदी उपस्थित होते.
इमर्सन कंपनीतर्फे 42 सीपीयू तर रोटरी क्लबतर्फे कीबोर्ड, मॉनिटर, माऊस , फर्निचर आणि अन्य संसाधने उपलब्ध करून देण्यात आली. या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, मानसग्राम मानसिक आरोग्य प्रकल्प, हिम्मतग्राम कृषी आणि रोजगार प्रकल्प, स्नेहालय इंग्रजी विद्यालय , केरिंग फ्रेंड्स रुग्णालय या प्रकल्पांना रोटरी सदस्यांनी भेटी दिल्या.

