नगर - जागतिक पर्यटन दिनानिमित्त नाशिक येथील पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक च्यावतीने नगरमधील शिल्पकार बालाजी वल्लाल यांना ‘पर्यटन मित्र 2021’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास पोलिस आयुक्त दिपक पांडे, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, वक्ते निलेश सोनवणे, जयेश तळगांवकर, रमेश पडवळ, संचालनालयाचे उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे, ट्रॅव्हल्स असोचे अध्यक्ष राजेंद्र बकरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी नितीनकुमार मुंडावरे म्हणाले, नाशिक विभागात अनेक ऐतिहासिक, धार्मिक स्थळांबरोबरच पर्यटनासाठी अनेक ठिकाणी आहेत.
पर्यटकांना याची माहिती व्हावी, या ठिकाणांचा विकास व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने विविध उपयायोजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटनास चालना देणार्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करुन त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
शिल्पकार बालाजी वल्लाळ यांनी नगर जिल्ह्यासह अनेक ठिकाणच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती साकारुन त्याचे महत्व आणि इतिहास नागरिकांना पटवून दिला आहे.
तसेच कोरोना लॉकडाऊन काळात टाकावू पासूनही कलाकृती निर्माण करुन अनेक मान्यवरांची वाहऽवाह मिळविली आहे. त्यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आता मिळालेल्या ‘पर्यटन मित्र’ पुरस्काराबद्दल त्यांचे अहमदनगर हॅरिटेज वॉक, इतिहासप्रेमी, व कलाप्रेमींनी अभिनंदन केले.


