पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान



गरीब, गरजू रुग्णांची आरोग्य पूर्वतपासणी करून त्यांच्या आजारांवर योग्य निदान व औषधोपचार मोफत करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून हे अभियान राज्यात बीड जिल्ह्यासह सहा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाविषयी ही माहिती. दैनंदिन आयुष्याच्या सुखकर वाटचालीसाठी निरामय जीवन अत्यावश्यक गोष्ट आहे. शरीर आणि मन स्वस्थ असेल तर माणूस कोणतेही आव्हान सहजपणे पेलू शकतो. व्यक्ति, स्वस्थ ग्राम आणि स्वस्थ राज्य या पायऱ्यावरूनच आपण स्वस्थ राष्ट्राचे अंतिम ध्येय गाठू शकतो. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून स्वस्थ भारत घडवण्यासाठी स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

या अभियानातर्गंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील  गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामुल्य वैद्यकीय सेवा देणे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व प्रथम निवडक जिल्ह्याच्या ठिकाणी पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहीम हाती घेण्याचे नियोजन आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतही जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामुल्य उपचार उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे. याकरिता संबंधित जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुखांसोबत वैद्यकीय शिक्षण विभागांअतर्गत सर्व शासकीय/खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायत यांच्या अखत्यारितील आरोग्य विभाग यांच्या सहभागाने व विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, समाजसेवक यांच्या समन्वयाने ही मोहिम राबविण्याचे शासनाने ठरविले आहे.

या मोहिमे अंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, ग्रंथीचे विकार, मनोविकार, कर्करोग, नाक-कान-घसा विकार, दंतरोग, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, लठ्ठपणा आदी विषयासंबंधीच्या आजारांची पूर्व तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेकरिता विविध विषयासंबंधीच्या आजारांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ समितीमार्फत, राज्यातील सामाजिक व पर्यावरणाची परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध आरोग्य मानकांनूसार पूर्व तपासणीच विहीत नमुने अंतिम करण्यात आले आहेत. तसेच, संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन यांनी तज्ज्ञ समितीमार्फत अंतिम करण्यात आलेले पूर्व तपासणीचे विहीत नमुने ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे.

या मोहिमेअंतर्गत पथदर्शी जिल्ह्यातील प्रत्येक गावांगावांत प्राथमिक आरोग्यकेंद्राअंतर्गत आरोग्य पूर्व तपासणी कक्ष स्थापित करण्यात आली आहे. यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था, समाजसेवक यांच्यामार्फत रुग्णजागृती करून त्यांना तपासणी कक्षामध्ये तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत प्रवृत्त करण्यात येत आहे.शहरी भागाबाबत सदर मोहिमेअंतर्गत पथदर्शी जिल्ह्यातील शहरांमध्ये प्रत्येक प्रभागातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य पूर्व तपासणी कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. 

त्याशिवाय वरील पैकी दोन्ही ठिकाणी उपचारास पुरेशी मदत न मिळु शकणाऱ्या रुग्णांसाठी सामाजिक संस्था, अशासकीय संस्था तसेच सामुदायिक सामाजिक दायित्व निधीद्वारे उपचारास मदत उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री यांचे आरोग्य सल्लागार व राज्य समन्वय अधिकारी यांनी स्वतंत्र कक्ष स्थापून नियोजन करावे, अशा सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत.

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आढळून आलेल्या विविध आजारांबाबत संशोधन करून शासनस्तरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन राज्यस्तरीय समन्वय समितीने करावी. या मोहिमेच्या आधारावर संपूर्ण राज्यात पंडित दीनयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित महात्मा फुले जिल्हा आरोग्य योजनेची पुढील आखणी करण्यात येणार आहे.सहा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेत सर्व रुग्णांनी सहभागी होऊन आपले आरोग्य सुधारण्याची सुवर्णसंधी दवडू नये यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रास तात्काळ संपर्क साधावा हेच अपेक्षित आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!