तिन हजारांपेक्षा जास्त लोकांवर आपत्ती....

तिन हजारांपेक्षा जास्त लोकांवर आपत्ती....
रेल्वे हमाल माथाडी कामगारांना 'काम द्या!' मागणीसाठी दि.७ सप्टेंबर रोजी सहकुटुंब मोर्चा आणि बेमुदत उपोषणाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न; कामगार संघटना महासंघ सहभागी होणार ! ३ हजारपेक्षा जास्त लोकांवर आपत्ती !



रेल्वे मालधक्क्यावर दि.३० ऑगस्‍ट रोजी 'हमाल माथाडी कामगारांना काम देण्यात यावे' या मागणीसाठी 'सिटू' संलग्न 'रेल्वे माथाडी व काँट्रॅक्ट लेबर युनियन'च्या वतीने हमाल माथाडी कामगारांची बैठक झाली. यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 

पासुन भर  संकटकाळात याच हमाल माथाडी कामगारांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता शेतीसाठी लागणारी खते, जनतेला लागणारे अन्नधान्य तसेच सिमेंट आदी माल उतरवला. जिल्ह्याची संकटकाळाची गरज भागवली. वाढत्या महागाई नुसार त्यांच्या हक्काची त्रैवार्षिक दरवाढ करणे गरजेचे असताना आता त्यांची अडवणूक केली जात आहे. हुंडेकरी व माल वाहतुकदार हे खत कंपन्या अधिकारी, सरकारी कृषी अधिकारी यासारख्या जनताद्रोही अधिका-यांच्या संगनमताने अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल बाहेरगावीच उतरवुन घेत आहेत. कोरोना संकटकाळात त्यांचे काम इतरत्र वळवुन आणखी एक बेरोजगारीची आपत्ती निर्माण केली जात आहे. येथील कष्टकरी हमाल माथाडी कामगारांना व कुटुंबियांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे. येथील हमाल माथाडी कामगार कष्टाचे पैसे मागत असताना त्याला ते दिले जात नाहीत. त्यांना कामापासुन वंचित ठेवले जात आहे. भर कोरोना संकटकाळात शहर व जिल्ह्याला याच हमाल माथाडी कामगारांनी काम करत खते, अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.
    येथे शहर आणि परिसरातील सुमारे सहाशे नोंदणीकृत कामगार काम करतात. त्यांच्यावर अवलंबुन असणारे त्यांचे लेकरंबाळं आणि कुटुंबिय मिळुन ३ हजारपेक्षा जास्त लोकांवर यामुळे आपत्ती कोसळली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, खते, सिमेंट व इतर माल येत असतो. दर तीन वर्षांनी वेतनवाढ विषयक करार होत असतो. परंतु गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे केवळ एक वर्षाचाच करार झाला. हा करार दि.३१ मार्च २०२१ रोजी संपुष्टात आला. या नंतर मालधक्क्यावरील माथाडी कामगार आणि हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांच्यामध्ये अनेकदा बोलणी झाली, पण करार होऊ शकला नाही. सरतेशेवटी सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, माथाडी कामगार मंडळ, अहमदनगर यांनी 'इतर जिल्ह्यातील रेल्वे मालधक्यावरील प्रचलित दरांचा सांगोपांग विचार करून' कामकाज सुरळीत होण्यासाठी दि.२८ जुलै २०२१ रोजी मजुरी व वाराईचे दर निश्चित करून काम सुरू करण्याचे आदेश दिले.
     माथाडी कामगारांनी प्रस्तुत आदेश मान्य असल्याचे आणि काम करण्यास तयार असल्याचे लेखी स्वरूपात कळविले. पण हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल जाणीवपूर्वक इतरत्र स्थलांतरीत केला. या संदर्भात सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, माथाडी कामगार मंडळ, अहमदनगर यांनी वारंवार आदेश देऊनही हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत.
 परिणामी अहमदनगर शहर व जिल्ह्यात अन्नधान्य आणि खते यांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे कोरोना काळात माथाडी कामगारांना काम नसल्याने तेही अस्वस्थ असून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.
    या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे माथाडी व काँट्रॅक्ट लेबर युनियन तर्फे दि.७ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण आयोजित करावे आणि तेथे जाताना सर्व कामगारांनी  आपल्या कुटुंबियांसह मोर्चाने जावे, असा निर्णय माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला.
    बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापुर येथील रेल्वे माथाडी व काँट्रॅक्ट लेबर युनियनचे नेते कॉम्रेड रमेशबाबू होते. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड महेबूब सय्यद, कामगार संघटना महासंघाचे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे कॉम्रेड रामदास वागस्कर, एम. एस. एम. आर. ए. चे कॉम्रेड राजू कांबळे आदी उपस्थित होते. अशी माहिती अहमदनगर मालधक्यावरील रेल्वे माथाडी व कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनचे स्थानिक निमंत्रक नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे आणि गणेश कंटूर यांनी दिली.
     या प्रसंगी सुरेश निरभुवणे, संजय पाडळे, शरद वाकचौरे, गणेश जाधव, संभाजी कोतकर, पोपट लोंढे, सागर पोळ, मधुकर पाटोळे, दीपक रोकडे, दत्तात्रय अनावणे, विलास गुंड, भगवान शेंडे, बळीराम शेंडे, वसंत पेटारे, रोहिदास भालेराव, अशोक चिलगर आदी उपस्थित होते.
००००
( फोटोओळ - रेल्वे मालधक्का 'काम द्या' मागणीसाठी आंदोलनपुर्व बैठकिस मार्गदर्शन करताना रेल्वे माथाडी व कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनचे कॉम्रेड रमेशबाबू, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सिटू' चे जिल्हाध्यक्ष महेबूब सय्यद आणि रेल्वे हमाल माथाडी कामगार बंधु )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!