पारनेर - करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर एसटीच्या प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे.त्यामुळे प्रत्येक आगारातून सुटणाऱ्या फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे.प्रवासी नसल्याने बसस्थानकांवरील परवानाधारक अस्थापनांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत.त्यामुळे परवाना शुल्क माफ करावे अशी मागणी जिल्ह्यातील परवानाधारकांच्या वतीने विभाग नियंत्रक विजय गिते यांच्याकडे करण्यात आली आहे.
पारनेर
बसस्थानकावरील वृत्तपत्र व्यावसायिक संजय वाघमारे व उपहारगृह चालक वसिम
राजे यांनी विभाग नियंत्रक विजय गिते यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात
म्हटले आहे की,व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी परवानाधारकांनी सध्या तोटा सहन
करीत व्यवसाय सुरू ठेवले आहेत.टाळेबंदीच्या काळात व्यावसायिकांचे कंबरडे
मोडले आहे.आर्थिक घडी विस्कटली आहे. बसस्थानकावरील उपहारगृहे,जनरल
स्टोअर्स,पुस्तक दुकाने ग्राहकांअभावी ओस पडल्याचे चित्र संपूर्ण
महाराष्ट्रात आहे.उपहारगृहे सुरू ठेवण्यासाठी नियमित करावा लागणारा खर्च
कर्मचाऱ्यांचे पगार याचा विचार केला तर उपहारगृहे सुरू ठेवल्याने
दिवसेंदिवस तोट्यात भर पडत आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात
वृत्तपत्रे,पुस्तके वाचणारांची संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची घटली
आहे.एकूणच सध्या असलेले परवाना शुल्क जमा करणे परवानाधारकांना अशक्यप्राय
झाले आहे.तरीही परवानाधारक व्यवसाय सुरू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत
असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सद्यपरिस्थितीचा
विचार करून माहे सप्टेंबर २०११ पासून करोना संसर्ग पूर्णपणे आटोक्यात
येईपर्यंत व प्रवासी संख्या,एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू होईपर्यंत
बसस्थानकांवरील व्यावसायिक अस्थापनांचे शुल्क माफ करावे.त्यासाठी आपण
वरिष्ठ कार्यालयाकडे प्रयत्न करावेत,अशी मागणी जिल्ह्यातील
परवानाधारकांच्या वतीने विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे.
करोना
संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संपूर्ण टाळेबंदीच्या
कालावधीतील साडेचार महिन्यांचे भाडे यापूर्वीच माफ करण्यात आले आहे.एसटी
महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर परवाना शुल्कात सवलत देण्याबाबत विचार सुरू
आहे. मात्र एसटी सध्या आर्थिक अडचणीत आहे.त्यामुळे सवलती संदर्भात निर्णय
होईपर्यंत परवानाधारकांनी परवाना शुल्क जमा करावे. - विजय गिते,विभाग नियंत्रक,रा.प. अहमदनगर विभाग.

