अष्टपैलू नवदुर्गा - वंदना बंदावणे

अष्टपैलू नवदुर्गा - वंदना बंदावणे
स्त्री ही सृजनाचं प्रतीक आहे. स्त्रीला देवीरूपात बघून समाज अनादि काळापासून तिची पूजा करीत आला आहे. स्त्रीमध्ये अफाट ताकद व तितकीच सहनशीलता आहे. म्हणून आजच्या आधुनिक युगात तिला दुय्यम स्थान मिळूनही ती पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. याची प्रचिती आपल्या आजूबाजूला येते. एखादी स्त्री कोणतेच महान कार्य करीत नाही पण अत्यंत संकटकाळी ती कुटुंबाला सावरते व पुन्हा समाजिक दर्जा प्राप्त करून देते. यावेळी ती नवदुर्गाच असते.

अशीच एक स्त्री म्हणजे वंदना वसंत बंदावणे. ही एक  एम. ए. एम. एड. (इंग्रजी) असलेली कलावंत स्त्री. शिक्षिका, कवयित्री, निर्माती व सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत कठीण व बिकट परिस्थितीत खंबीरपणे कुटुंबाला सावरणारी स्त्री म्हणून आज या सदरात त्यांच्या कर्तृत्वाचा समावेश आपण करीत आहोत. वंदना यांना संगमनेरच्या जोशी महाविद्यालयात असल्यापासून नाटक व नृत्याची आवड आहे. पुढे संग्राम नाट्यसंस्थेत नाटके करीत असताना वसंत बंदावणे या तरुण शिक्षकाची ओळख झाली. वसंत हाही कलावंत असल्याने दोघांनी डॉ. मुटकुळे यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक नाटकांत सहभाग घेतला. नाटकात हिरो हिरोईनचा रोल करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले व खर्‍या आयुष्यात हिरो हिरोईन झाले. दोघांनी ‘कलाश्री’ नावाची संस्था काढली. 

 

ती चालवण्यामध्ये वंदनाचा सिंहाचा वाटा होता. पण एक भयाण संकट तिच्या आयुष्यात उभे राहिले. पतीवर आळ येऊन त्याला अटक झाली. सात वर्षे पती कारागृहात असताना वंदनाने एकटीने संसार चालवला. समाजाला सक्षमपणे तोंड दिले. सगळे टक्के टोनपे सहन केले पण हार मानली नाही. एक मुलगा बी. कॉम. करून तो पुण्याला स्थाईक आहे. दुसरा फिल्म क्षेत्रात नावाजलेला आर्ट डायरेक्टर आहे. मुलगी डेंटिस्ट आहे. पती बाहेर आल्यावर त्याच्या जेलच्या अनुभवावर तीने ‘बंदीशाळा’ या मालिकेची निर्मिती करून त्याचे समाजिक स्थान परत मिळवले.


सिद्धार्थ विद्यालयात नोकरी करीत असताना विद्यालयाला व विद्यार्थ्यांना अनेक पारितोषिके मिळवून दिली. अनेक नाटकांतून अभिनयाची बक्षिसे मिळवली. दूरदर्शनवर इथं नांदते एकात्मता, आजचे पाहुणे, ग्रामीण भारत, आमची माती आमची  माणसे या कार्यक्रमांचे निवेदनांसह अनेक कार्यक्रम व मालिका केल्या. मिशन, ग्लोबल आडगाव या सिनेमांत भूमिका केल्या. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदक मिळवले. त्यांच्या ‘बळीराणी’ फिल्मला राज्य शासनाचा तर ‘राहत’ या हिंदी फिल्माला दिल्लीचा ‘प्रबुद्ध रत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे. पतीच्या संकटकाळात पुणेच्या टिळक विद्यापीठातून बीजेची पदवी मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. 


माध्यमिक शिक्षक संघ, इंग्रजी शिक्षक संघटना, अखिल गुरव समाज संघटना या संस्थांवर त्या कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून त्या पतीच्या फिल्म निर्मिती व्यवसायात सक्रिय असतात. आजही सतत कामात राहून त्या शैक्षणिक व कला क्षेत्रात कार्यरत आहेत. संकट समयी खचून न जाता कसे उभे राहून कुटुंब सावरावे याचा आदर्श त्यांनी भगिनींना घालून दिला आहे. अशा या नवदुर्गेला मानाचा मुजरा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!