आहारातील नवदुर्गा - उज्ज्वला महाले
संगमनेरी खमंग ढोकळा या ब्रँडची निर्मिती म्हणून कौतुकास्पद कामगिरी करणार्या उज्ज्वला सुनील महाले यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांच्या ‘संगमनेरी खमंग ढोकळ्याची’ चव संगमनेरकरांच्या जिभेवर जणू तरळते आहे. कुणाचा वाढदिवस असो की, घरी पाहुणे असो... उज्ज्वला ताईंच्या ढोकळ्याशिवाय लज्जत येणार तरी कशी?
खरंतर लग्नानंतर पदोपदी येणार्या संकटांमुळे आत्महत्येचा विचार बळावत असताना उज्ज्वला सुनील महाले यांच्या जीवनात जवळे कडलग (ता. संगमनेर) येथील स्वामी विवेकानंद वाचनालय, प्रसिद्ध लेखक व उद्योजक विठ्ठल कामत यांच्या ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या पुस्तकाने परिवर्तन घडवून आणले. आणि त्या ‘संगमनेरी खमंग ढोकळाच्या’ माध्यमातून उद्योगिनी झाल्या. आज त्यांचा ढोकळा सामान्यांपासून श्रीमंतांच्या जिभेचे लाड पुरविणारा घटक ठरला आहे. त्यांच्या असामान्य इच्छाशक्तीने उभा राहिलेला हा सेवा उद्योग आज गगनभरारी घेत आहे. अगदी विठ्ठल कामत यांनी प्रत्यक्ष येऊन त्यांची पाठ थोपटली आहे आणि आत्महत्येचा विचार करणार्या उज्ज्वलाताई या ‘संगमनेरी खमंग ढोकळ्याच्या’ निर्मितीच्या माध्यमातून अनेकांच्या प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.
मूळच्या अहमदनगरच्या असणार्या उज्वलाताईंचे लग्न जवळे कडलगच्या सुनील दिगंबर महाले यांच्या बरोबर झाले. काही दिवस त्यांचा सुखी संसार सुरू होता. सुनील महाले हे पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते. प्रचंड बुद्धिमत्ता, मात्र उत्पन्न तुटपुंजे! घरात सासरे सेवानिवृत्त दिगंबर महाले यांची पेन्शन हाच मोठा आधार! त्यावर मुलगा समर्थ आणि स्वामी, सासूबाई निर्मला तथा नंनी, दीर संतोष या सर्वांची भिस्त. दुर्दैवाचे दशावतार असे की मुलगा समर्थ हा जन्मापासून गतिमंद! सेरेब्रल पाल्सी हा आजार त्याला झालेला.
मुलाचे दुःख पाहून उज्ज्वलाताईंचे मन विषण्ण व्हायचे! आपण कोणते पाप केले म्हणून असे दिवस आपल्या वाट्याला आले? अशा विचाराने त्या अस्वस्थ होत. तरीही सुनील आणि उज्ज्वलाची जोडी राब-राब राबायची, पैसे कमवायची. मात्र, पैसे कमावले की घरातले कुणीतरी आजारी पडायचे किंवा काहीतरी खड्डा तरी पडायचा. प्रचंड मेहनतीने कमावलेला पैसा असा डोळ्यादेखत निघून जायचा आणि हे जोडपं अगतिक होऊन केवळ बघत बसायचं. आणि मग उज्ज्वलाताईंच्या मनात आत्महत्या करायची असा विचार अधिक ठळक व्हायचा.
अशा परिस्थितीत जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह सुनील कडलग सर यांनी उज्ज्वलाताईंना वाचनालयात ग्रंथपाल पदावर काम करण्याची संधी प्राप्त करुन दिली आणि ताईंच्या जगण्याला बळ मिळालं. ग्रंथालयात काम करताना विठ्ठल कामतांचं ‘इडली, ऑर्किड आणि मी’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं आणि ताईंचं अवघ जीवनच बदलून गेलं. यामुळे आत्महत्या करण्यास निघालेल्या उज्ज्वलाताईंनी विठ्ठल कामतांपासून प्रेरणा घेत संगमनेरी खमंग ढोकळ्याची निर्मिती करून यशोशिखर गाठलं!
‘इडली, ऑर्किड आणि मी’मधील विठ्ठल कामत सुध्दा जीवन संघर्ष करत असताना एकदा हतबल होतात व शेवटी आत्महत्या करायला निघतात. मात्र, केवळ काही रुपयांसाठी मोठी रिस्क घेऊन काम करणार्या पेंटरपासून प्रेरणा घेऊन ते त्यांचा आत्महत्या करण्याचा निर्णय बदलतात व यशस्वी होतात. कामतांच्या जीवनातील हा प्रसंग वाचून उज्ज्वलाताई सुद्धा लढण्यासाठी सिद्ध होतात आणि संगमनेरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणार्या ‘संगमनेरी खमंग ढोकळ्याची’ निर्मिती करतात ही सर्व कथा उद्योजक विठ्ठल कामतांना समजते व ते अचानक उज्ज्वलाताईंच्या या दुकानाला भेट देण्यासाठी संगमनेरात दत्त म्हणून हजर होतात. आणि मग संगमनेरी खमंग ढोकळा प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचतो. चित्रपटाला शोभेल अशी ही यशोगाथा साकारणार्या उज्ज्वलाताईंना आज अनेकविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘जीवनात निराश न होता कसे लढावे’ ह्यासाठी त्या प्रेरणादायी बनल्या आहेत. अगदी करोना या महामारीने सर्वांना त्रस्त केलेले असतानाही ताईंचा हा खमंग ढोकळा घरपोच सेवेने संगमनेरकराना तृप्त करत आहे.
‘संगमनेरी खमंग ढोकळ्याने’ एक तप पूर्ण केले आहे. याकाळात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. त्या संकटांमध्येही त्यांनी संधी शोधली आणि आपल्यातील क्षमता अजमावत धैर्याने पाय रोवून त्या उभ्या राहिल्या. अशा या उज्ज्वला सुनील महाले यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता गतिमंद समर्थला त्या देवाचा प्रसाद म्हणून सांभाळतात, त्याची सेवा करतात. आजही संकट कमी नाहीत पण जगण्याची आणि लढण्याची उमेद मात्र नक्की आहे. ही उमेद ‘स्वामी विवेकानंद वाचनालयाने व विठ्ठल कामतांच्या इडली, ऑर्किड आणि मी’ने दिलीय हे त्या नम्रपणे नमूद करतात.
आता संगमनेरी खमंग ढोकळ्याच्या भविष्याचे सोनेरी स्वप्न पाहताना प्रत्येक गृहिणीला ढोकळा करता यावा यासाठी उज्ज्वलाताईंचे ‘संगमनेरी खमंग ढोकळा इन्स्टंट पीठ’ आकर्षक अशा पॅकींगमध्ये छान कृतीसह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. लवकरच त्यांचे संगमनेरी खमंग ढोकळा इन्स्टंट पीठ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. उज्ज्वलाताईंचे पती अतिशय नम्र व उत्साही सुनीलभाऊ हे त्यांना साथ देत आहेत. उज्ज्वलाताईंच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊयात. सर्वांच्या माहितीसाठी उज्ज्वलाताईंचा भ्रमणध्वनी क्रमांक : 9604781440.
लेखिका : वृषाली सुनील कडलग.
उपाध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देशमुख मळा, धांदरफळ, ता. संगमनेर.
