रोटरी क्लब प्रियदर्शिनीचा प्रगत महाविद्यालयात उपक्रम
नगर - येथील प्रगत कला महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्यावतीने स्वच्छतेचे महत्व सांगून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा शशी झंवर, प्रोजेक्ट प्रायोजक प्रतिभा धूत, सुरेखा मणियार, ज्योती गांधी, कुंदा हळबे आदि उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षा शशी झंवर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थींनीशी संवाद साधून स्वच्छता, आत्मसंरक्षण आदि विषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रोटरीच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्या माध्यमातून महिलांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
यावेळी प्रियदर्शिनीच्या सदस्यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे कौतुक केले. प्रास्तविकात प्राचार्य नुरील भोसले यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रियदर्शिनीच्या वतीने महाविद्यालयास केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
याप्रसंगी प्रा.महावीर सोनटक्के, दिनेश अष्टेकर आदिंसह प्राध्यापक- कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमास संस्थेचे चेअरमन रा.रेव्ह.डाॅ. प्रदिप कांबळे, सचिव अॅड. विनायक पंडीत व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या
