जिल्ह्यातील 800 ज्येष्ठांना घडणार अयोध्या तीर्थदर्शन
नगर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्त स्थगित झालेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेसाठी प्रशासन पुन्हा अनुकूल झाले आहे. योजनेतून जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना आता अयोध्याचे श्रीराम मंदिर दर्शन घडवले जाणार असून, 6 मार्च रोजी ही रेल्वे यात्रा नगरमधून प्रस्थान करणार आहे.
राज्य शासनातर्फे सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात समाजकल्याणचे तत्कालीन सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी गावोगावी शिबिरे घेऊन तीर्थदर्शनचे अर्ज भरून घेतले होते. जिल्हा निवड समितीने 800 ज्येष्ठ नागरिकांची यात्रेसाठी निवड केली होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रा सुरू केली जाणार होती. मात्र तत्पूर्वीच लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांची यात्रेसाठी निवड झाली होती, त्यांचा हिरमोड झाला. मात्र शासनाने पुन्हा एकदा ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही सुधारणा करण्यात आली आहे. रेल्वे विभागासोबत शासनाचा तसा करार झाला आहे.
6 ते 10 मार्च या कालावधीत अयोध्या यात्रा नेली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील समितीने निवड केलेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांच्या यादीची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यांना 15 दिवस अगोदरचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले जाईल. शिवाय 750 पेक्षा कमी ज्येष्ठ नागरिक यात्रेत आल्यास शासनाच्या खर्चाच्या अपव्ययाची जबाबदारी सहायक आयुक्तांवर ठेवली जाणार असल्याचे पत्र तीर्थदर्शन योजनेचे नोडल अधिकारी तथा समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नुकतेच पत्र काढले आहे.

