विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना चालना
देणारे सृजनशीलता शिबिर संपन्न
विद्यार्थ्यांमधील कलात्मकता, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्ती जोपासण्यासाठी ‘नौजवान भारत सभा’ ने आयोजित केलेल्या चौथ्या सृजनशीलता शिबिराचा यशस्वी समारोप
नगर : संपुर्ण शिबीराच्या कालावधीत महाराष्ट्र बालक मंदिर शाळा, अहिल्यानगर येथे ‘नौजवान भारत सभा’च्या वतीने 6 दिवसीय विद्यार्थी सृजनशीलता शिबिराच्या चौथ्या वर्षाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेची आणि सर्जनशीलतेची जाणीव निर्माण करून त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला बळ देणे हाच होता.
शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत, चित्रकला, शिल्पकला, विज्ञान प्रयोग, क्राफ्ट, रंगीत तालीम, सहल, सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांनी जीवनातील आनंद, दु:ख, संघर्ष यांचे विविध माध्यमांतून कलात्मक रूपांतरण करण्याची क्षमता शिकली. भांडवली व्यवस्थेच्या दैनंदिन प्रभावांपासून विद्यार्थ्यांना दूर नेऊन मुक्त विचार, स्वनिर्मिती, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनशीलतेची बीजे रुजवण्याचे कार्य या शिबिराने केले.
शिबिराच्या पहिल्या तीन दिवसांची सुरुवात राजू म्याना सरांच्या शारीरिक प्रशिक्षणाने झाली. गटांमध्ये एकत्र बसून नाष्टा करणे, एकत्र काम करणे, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गटशिस्त, सहकार्य, सृजनशील संवाद आणि आत्मविश्वास निर्माण झाला. चित्रकला सत्रात समृद्धी वाकळे व पुनम शेरकर यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील पद्धती, रंग भरणे, रेषा काढणे, चेहऱ्याच्या रेषांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रे रेखाटून आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याचे प्रशिक्षण दिले.
पहिल्या सत्रात अर्चना मॅडम यांनी मानवाची उत्क्रांती आणि वानरापासून माणूस बनण्यात श्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. दुसऱ्या सत्रात सुष्मित राव यांनी विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला. तिसऱ्या सत्रात स्मिता म्याना यांनी हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
शिल्पकलेच्या सत्रात शिल्पकार विकास कांबळे सरांनी शाडू मातीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी विविध आकृती घडविल्या आणि मूर्तीकलेची प्राथमिक ओळख करून दिली. रंगीत तालीम सत्रासाठी संपूर्ण दिवस राखून ठेवण्यात आला होता. यामध्ये गाणे, समूह नृत्य, नाटक, लघुनाट्य इत्यादी कलाप्रकारांची तयारी करण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यासपीठाची ओळख आणि सादरीकरणातील आत्मविश्वास देण्यात आला. शेवटी सादरीकरण व समारोप कार्यक्रम पार पडला.
सुरुवातीला सिद्धार्थनगर भागामधून रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये अहमदनगर जिल्हामराठा संस्थेचे विश्वस्त सचिव आठरे पाटील, संगमनेर महाविद्यालयाचे प्राध्यापक सुभाष कडलग, पिस फाउंडेशनचे अर्शद भाई आणि ‘रुजवात’ मार्क्सवादी अभ्यास गटाचे समन्वयक व अभ्यासक अभिजीत मीनाक्षी यांचा समावेश होता. सर्वच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.आणि नवसमाज निर्मितीसाठी मुलांनच्या सर्जनशीलतेला योग्य वेळी मार्गदर्शन भेटण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सर्व शिबिरार्थी मुलांना सहभाग प्रमाणपत्र ही वाटप करण्यात आले.
‘स्पेस ओडिसी’ येथील तारांगणात विद्यार्थ्यांसाठी सहल आयोजित करण्यात आली होती. ज्यात त्यांनी अवकाश शास्त्राची ओळख करून घेतली आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. या शिबिरादरम्यान ‘नौजवान भारत सभा’च्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना शहीद भगतसिंह व त्यांच्या विचारसरणीबद्दल माहिती दिली. क्रांतीकारी गीतांचे सादरीकरणही उत्साहाने करण्यात आले. नव्या काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा हीच सर्जनशीलतेची खरी सुरुवात आहे, आणि ही प्रेरणा विद्यार्थ्यांनी या शिबिरातून अनुभवली.




