धोकादायक शाळा इमारतीकडे दुर्लक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा ठिया आंदोलनाद्वारे निषेध

धोकादायक शाळा इमारतीकडे दुर्लक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा ठिया आंदोलनाद्वारे निषेध

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा सारोळाबद्दी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीची तातडीची मागणी- प्रकाश पोटे


नगर - नगर तालुक्यातील मौजे सारोळाबद्दी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता सागर चौधरी यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात आले. शाळेच्या इमारतीतील वर्गखोल्यांच्या भिंतींना मोठे तडे गेले असून पावसाळ्यात छतावरून पाणी गळते. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित वातावरणात घेणे अशक्य झाले आहे.


मुख्याध्यापकांनी गेल्या वर्षभरात अनेकदा लेखी स्वरूपात शिक्षण विभाग व बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
सदर इमारतीचे बांधकाम सुमारे 2004- 5 साली झाले असून सध्या तिची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की ती केव्हाही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की सध्या विद्यार्थ्यांना झाडाखाली वर्ग घ्यावे लागत आहेत. शासनाच्या नियमांनुसार 40 वर्षांपूर्वीच्या इमारतींचे निर्लेखन करून नवीन बांधकामे केली जातात. मात्र या इमारतीला केवळ 20 वर्षांचा कालावधी झाल्याने ती नियमांनुसार पाडण्यास बसत नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन हात झटकत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांनी सांगितले की, या इमारतीचा कोणत्याही क्षणी दुर्घटना घडवून जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तात्काळ पाहणी करून दोन नवीन वर्गखोल्यांची मंजुरी द्यावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.


या ठिया आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत बोरुडे, बाळासाहेब पुंड, अभिमन्यू बोरुडे, प्रवीण बोरुडे, संदीप म्हस्के, सचिन बोरुडे, महेश बोरुडे, नवनाथ डाडर, आकाश डहाने, चंद्रकांत बोरुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी कार्यकारी अभियंता सागर चौधरी यांना निवेदन देत शाळेच्या इमारतीची तात्काळ पाहणी करून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.


शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गामध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी असून नवीन वर्षाआधी शाळेला सुरक्षित इमारत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!