करिअरसोबत आत्मशोध आणि समाजभानाचा संगम: स्नेहालयाचे 35 वे राज्यस्तरीय सामाजिक जाणीव निर्मिती युवा शिबिर

करिअरसोबत आत्मशोध आणि समाजभानाचा संगम: स्नेहालयचे 35 वे राज्यस्तरीय सामाजिक जाणीव निर्मिती युवा शिबिर

नगर : तरुणाईला करिअरसोबत सामाजिक जाणीव, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देण्यासाठी स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पातर्फे 35 वे राज्यस्तरीय सामाजिक जाणीव निर्मिती निवासी शिबिर दि. 21 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे. "सामाजिक जाणिवेतून बदलाच्या कृतीकडे, युवा जागृतीतून राष्ट्रनिर्माणाकडे!" या संकल्पनेवर आधारित या शिबिरात राज्यभरातील निवडक युवक-युवती सहभागी होणार असल्याची माहिती स्नेहालयचे संचालक हनिफ शेख यांनी दिली.

snehalaya



आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर आणि रोजगाराबरोबरच बेरोजगारी, व्यसनाधीनता, सामाजिक असंवेदनशीलता, पर्यावरणीय संकटे आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव यांसारख्या सामाजिक आव्हानांनाही युवकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजभान, मानवी मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने स्नेहालयच्या युवानिर्माण प्रकल्पामार्फत 2005 पासून सातत्याने युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

हे निवासी शिबिर युवकांसाठी आत्मशोध, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव देणारे ठरणार आहे. संघर्षातून यश मिळविलेल्या प्रेरणादायी व्यक्तींशी संवाद, सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव यामुळे युवकांना स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्याची आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा मिळणार आहे.

शिबिरात गटचर्चा, योग, श्रमदान, करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणागीते तसेच विविध रचनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य, संघटनक्षमता, चिकित्सक विचार आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या शिबिरासाठी 20 ते 30 वर्षे वयोगटातील निवडक 150 युवक-युवतींना प्रवेश दिला जाणार आहे. NSS, NCC तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2026 असून निवड झालेल्या उमेदवारांना 15 ऑगस्ट रोजी ई-मेल व एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. प्रवेश शुल्क 300 रुपये असून निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

शिबिरार्थींनी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुल, एफ ब्लॉक, सर्व्हे नं. 239, श्री टाईल्स चौक, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे उपस्थित राहावे. प्रवेशासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच महाविद्यालयामार्फत सहभागी होत असल्यास कॉलेज लेटर सोबत आणणे आवश्यक आहे.

ऑनलाइन नोंदणी www.snehalaya.org/volunteer-youth-camp या संकेतस्थळावर सुरू असून अधिक माहितीसाठी विकास सुतार (9011026472), नितीन वावरे (9850008396)  अजित जगताप (8275899959) आणि नेहा धिवरे (93229 44565) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

"स्वतःचा आत्मशोध घ्या, समाजाशी नाते जोडा आणि परिवर्तनाचा भाग बना," या संदेशातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर युवकांना करिअरसोबतच समाजासाठी जबाबदार, संवेदनशील आणि परिवर्तनशील नागरिक म्हणून घडविणारे ठरेल, असा विश्वास स्नेहालयचे डॉ. विनय कोपरकर आणि हनिफ शेख यांनी व्यक्त केला.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!