सौंदाळा पंचक्रोशी मानसिक आरोग्य संपन्न करण्याचा संकल्प
सौंदाळा : जातीय आणि सामाजिक ऐक्यासाठी देशासमोर आदर्श ठेवणाऱ्या सौंदाळा पंचक्रोशीला मानसिक आरोग्य संपन्न करण्याचा संकल्प सौंदाळा गावाचे सरपंच शरद आरगडे यांनी केला. यापुढे परिसरात एकही विद्यार्थी आत्महत्या होणार नाही यासाठी संवाद आणि प्रबोधन या माध्यमातून काम केले जाईल असेही श्री आरगडे म्हणाले. सौंदाळा परिसरात 13 ते 18 या किशोरवयीन 9 शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या पार्श्वभूमीवर जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्यावरील बहुउद्देशीय मानसग्राम प्रकल्प आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदाळा गावात अभियान प्रबोधनाची व्यापक मोहीम राबवण्यात आली.यासंदर्भात तणावग्रस्त विद्यार्थ्यांना शोधणे, त्यांच्या तणावाच्या कारणांवर संवाद - समुपदेशन देणे,आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशकांना सुयोग्य प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन, 24 x 7 मानसिक आरोग्य हेल्पलाइन बद्दल प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचविणे, वाचन अभियान आणि सांस्कृतिक उपक्रमांचे सर्व विद्यार्थ्यांच्या सोबतीने आयोजन करण्याबाबत ग्रामपंचायत, मानसग्राम, आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसोपचार विभाग यांनी नियोजन केले आहे. गावामध्ये मानसिक आरोग्य सप्ताहात चित्रकला स्पर्धा, बरे झालेल्या मानसिक रुग्णांची मनोगते, शाळांमधून मानसिक आरोग्याचे प्रबोधन करणाऱ्या स्पर्धा, मानसग्राम प्रकल्पातील बऱ्या झालेल्या मनोयात्रेंद्वारे पथनाट्याचे सादरीकरण यांचा समावेश होता.
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज करंदीकर, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉ.तेजस्विनी मिस्कीन , डॉ. अंशू मुळे, समुपदेशक मीनल काटकोल,मानसग्रामचे समन्वयक रमाकांत दोड्डी, सोनाली साळवे, समीक्षा पवार, रवीना आत्राम, हनुमान डावकर आणि गोपाल ठाकरे, गणेश धारकर, यांनी विशेष परिश्रम घेतले. भेंडा येथील जिजामाता कला व शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य जनजागृती मोहिमेत सहभाग दिला.

