जागतिक हृदय दिन...

हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून 29 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो. जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली (1999). जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (1997-99) आंतोनियो लुना यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार 24 सप्टेंबर, 2000 रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन 2011 पासून 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.


जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत. हृदयविकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका यांद्वारे 29 सप्टेंबर यादिवशी जनजागृती केली जाते. आंतरराष्ट्रीय हृदय संशोधन संस्था आणि वैद्यकीय समूहांद्वारे शास्त्रीय बैठक आणि चर्चा आयोजित केल्या जातात. तसेच जागतिक हृदय दिवसानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जातात. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते.

प्रत्येक वर्षी जागतिक हृदय संघटनेद्वारे कार्यक्रमाची रूपरेखा उद्धृत केली जाते. प्रथम वर्षी  शारीरिक सक्रियता या रूपरेषेला अनुसरून जनसामान्यांमध्ये माहितीचा प्रसार करण्यात आला. 2003 मध्ये ‘स्त्री आणि हृदयविकार’ ही रूपरेषा ठरवण्यात आली. याद्वारे स्त्रियांमध्ये उद्भवणार्‍या हृदयविकाराची कारणमीमांसा आणि उपचार यांबाबत माहिती देण्यात आली. 2008 मध्ये ‘हृदयविकाराची शक्यता’ याचे मोजमापन करण्याबाबत रूपरेषा आखण्यात आली. याद्वारे व्यक्तिसापेक्ष हृदयविकार होण्याच्या संभावनांचे मूल्यमापन करण्यात आले. 2019 मध्ये स्वत:च्या आणि इतरांच्या हृदयाची काळजी घेण्याबाबत  रूपरेषा योजण्यात आली. अशा पद्धतीने संतुलित वजन, निरोगी हृदयासाठी आवश्यक जीवनशैली तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हृदय निरोगी राखण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण रूपारेखांना वाहिलेले कार्यक्रम देखील जागतिक हृदय दिवस या दिवसाच्या निमित्ताने आखण्यात येतात.


कोरोना महामारीच्या काळातही हृदयाशी संबंधित आजार असणार्‍या लोकांना अधिक त्रास होतो आहे. अशा व्यक्तींनी कोरोनाकाळात घराबाहेर पडूच नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे याकाळात आपल्या हृदयाची योग्य ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. जंक फूड, वाढता तणाव, वेळेवर व्यायाम न करणे या गोष्टी नेहमी हृदयरोगाला निमंत्रण देतात. जगभरातल्या वेगवेगळ्या संस्था याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेत असतात. मागच्या 5 वर्षांमध्ये हृदयाशी संबंधित विकार असणार्‍या रुग्णांच्या संखेत वाढ झाली आहे. 30 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार बळावताना दिसत आहे. यामुळे वेळीच शरीरासह हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.

* पोषक आहार
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर, जंक फूडचा वापर वाढत असल्याने आपली जीवनशैली अनियमित बनत चालली आहे. ताज्या भाज्या, घरगुती अन्न आपल्या हृदय आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. सेंद्रीय पद्धतीने पिकवल्या जाणार्या भाज्या, धान्य, प्रथिनेयुक्त खाद्य पदार्थ (चिकन, अंडी, मांस) यांचा आहारात समवेश करावा. खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणात करावा. आपल्या आहारात दूध आणि दुग्ध उत्पादनांचा देखील प्रमाणात समावेश करावा. सकस अन्न पदार्थ पोटात गेल्याने शरीर तंदुरुस्त होतेच, पण हृदय निरोगी राखण्यासदेखील मदत होते.


* ताण-तणाव नियोजन

कोरोना काळात प्रत्येकजण तणावपूर्ण आयुष्य जगत आहे. एकीकडे संसर्गाची भीती आहे, तर दुसरीकडे, नोकरी गमावणे, आर्थिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे तणाव वाढत आहे. याकाळात संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. परंतु, याकाळात जर आपल्याला तणाव येत असल्यास त्याचे वेळीच नियोजन करावे. मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी कराव्या. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह कॉलवर, व्हिडिओ चॅटवर गप्पा माराव्या. आपल्याला काय वाटते, याबद्दल त्यांना सांगावे, जेणेकरुन या तणावातून मुक्त होण्यास तुम्हाला मदत होईल. वाढत्या तणावाचा मन आणि शरीरासह हृदयावर देखील गंभीर परिणाम होत असतो.
* शारीरिक व्यायाम
दिवसातून किमान 45 मिनिटे व्यायाम करणे किंवा चालणे शरीर सुधृढ ठेवण्यास मदत फायदेशीर ठरते. सध्या कोरोनामुळे जरी घराबाहेर जाता येत नसले, तरी घरातच किमान 10 हजार पावले चालून जितका व्यायाम होती, तितकी शारीरिक कसरत करावी. योग-प्राणायाम या सारख्या व्यायामांमुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी संतुलित राहते. परिणामी तंदुरस्त शरीरासह हृदय देखील निरोगी बनते.


* पुरेशी झोप

हृदय निरोगी ठेण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. झोपेचा अभाव हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढवतो. आजकाल वर्क फ्रोम होम सुरू असल्याने बरेच लोक दुपारी झोप काढतात आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि वेगवेगळ्या तक्रारी उद्भवायला लागतात. रात्री कमीत कमी 7-8 तास झोप मिळाल्यास, दिवसा शरीर-मन तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत होते. याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.


* नियमित तपासणी

वरील सर्व गोष्टींचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहेच. परंतु, याबरोबर हृदयाची संपूर्ण निरोगीता सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करणे देखील आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार हृदयाची नियमित तपासणी करणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच, दर सहा महिन्यांनी तपासणी करावी. हृदयासंबंधित कुठलीही तक्रार किंवा समस्या वाटल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!