ब्रिटीशकालीन भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधीवादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री एक महान नेता व स्वातंत्र्य सेनानी होते. त्याचप्रमाणे, संपूर्ण देशांत त्यांची प्रतिमा एक दूरदर्शी, इमानदार आणि निष्ठावंत राजनेत्याच्या स्वरुपात प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक संकटांना सामोरे जात देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री त्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे याकरिता आपले जीवन समर्पित केले होते. त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून देशांतील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत करून इंग्रज सरकारला त्रासून टाकले होते. अशाप्रकारे त्यांनी देशाच्या अनेक भागात इंग्रज सरकारविरुद्ध भडकावू भाषण करून तेथील लोकांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याप्रती आग निर्माण केली. इतकेच नाही तर, देशांत दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांनी ‘श्वेत क्रांतीला’ पाठिंबा दर्शविला. चला तर जाणून घेवूया महान, स्वतंत्र सेनानी, निष्ठावंत आणि इमानदार राजनेता म्हणून ओळख असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन चरित्र.
* लाल बहादूर शास्त्री यांचे सुरुवाती जीवन -
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान देणारे, थोर स्वातंत्र्य सेनानी व सच्चे देशभक्त लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1904 साली उत्तरप्रदेश राज्यांतील मुगलसुराय येथे एका प्राध्यापकांच्या घरी झाला होता. लाल बहादूर शास्त्री यांचे वडील मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव एक इमानदार आणि प्रतिष्ठित अध्यापक होते. ज्यांनी काही काळ आयकर विभागात सेवा दिली होती. लाल बहादूर शास्त्री दीड वर्षाचे असतांना त्यांच्या जीवनांत एक दु:खद घटना घडली. त्यांचे वडील मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव यांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या आई रामदुलारी शास्त्री त्यांना घेऊन आपल्या माहेरी मिर्झापूर या गावी वडिल हजारी लाल यांच्या घरी घेऊन आल्या. त्यामुळे त्यांचे बालपण हे आजोळी आजी आजोबांच्या सान्निध्यात झाले.
* लाल बहादूर शास्त्री यांचे शैक्षणिक जीवन -
लाल बहादूर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या आजोळी मिर्झापूर येथेच झाले. तर, माध्यमिक शिक्षणाकरिता त्यांना वाराणसी येथे जावे लागले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद नामक गुरु भेटले. त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी कशी विद्यापीठमधून (वर्तमान महात्मा गांधी कशी विद्यापीठ) पदवी ग्रहण केली. निल्कामेश्वर प्रसाद यांनी लाल बहादूर शास्त्री यांना महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व समजावून सांगितले. लाल बहादूर शास्त्री अकरा वर्षाचे असतांना बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी महात्मा गांधी आल्याचे त्यांना दिसले. त्याठिकाणी महात्मा गांधी यांचे भाषण ऐकून ते भारावून गेले. यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांची पाठ कधीच सोडली नाही. महात्मा गांधी यांचे चंपारण्य आंदोलन, रौलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटना त्यांच्या मनात घर करून बसल्या होत्या. विदेशी मालाचा बहिष्कार, स्वदेशी वापर यासारख्या महात्मा गांधी यांच्या आंदोलनाच्या विचाराच्या विळख्यातून सुटताच सन 1926 साली कशी विद्यापीठाने त्यांना शास्त्री ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मूळ नाव श्रीवास्तव असताना त्यांच्या नावासमोर शास्त्री हे नाव जोडल्या गेले. शास्त्रींनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशांचे महान स्वातंत्र्यसेनानी लाल लाजपत राय यांच्याद्वारा सुरु करण्यात आलेल्या ‘द सर्वेन्ट्स ऑफ द पिपल सोसाइटीशी जोडल्या गेले. लाला लाजपत राय यांनी सुरु केलेल्या ‘द सर्वेन्ट्स ऑफ द पिपल सोसाइटीचा मुख्य उद्देश हा देशातील नव युवकांना प्रशिक्षित करून त्यांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याकरता त्यांनी नेहमीच जागृत असलं पाहिजे. यानंतर सन 1927 साली लाल बहादूर शास्त्री यांचा ललिता देवी यांच्यासोबत विवाह झाला. या दाम्पत्यांना लग्नानंतर सहा आपत्ये झाली.
* देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल बहादूर शास्त्री यांचे महत्वपूर्ण योगदान -
ब्रिटीशांच्या राजवटीपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आपले सर्वस्व अर्पण करणार्या थोर स्वातंत्र्य सैनिकांपैकी लाल बहादूर शास्त्री हे देखील थोर क्रांतिकारक होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले सर्वस्व अर्पण करून देशांतील लोकांच्या मनात आपल्या भाषणाच्या माध्यमातून स्वातंत्र्याची थिणगी पेटवली होती. लाल बहादूर शास्त्री केवळ 16-17 वर्षाचे असताना त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात उडी घेतली होती. शास्त्रीजी महात्मा गांधी यांच्या विचारधारेमुळे खूप प्रेरित झाले होते. त्यामुळे ते महात्मा गांधी यांना आपले गुरु मानत असत. महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध चालवलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी होवून शास्त्री यांनी महत्वपूर्ण कामगिरी निभावली होती.
शास्त्री यांच्या गुरु भक्तीबाबत सांगायचं म्हणजे सन 1921 साली शास्त्रीजी शाळेत शिक्षण घेत असताना त्यांनी महात्मा गांधी यांनी चालविलेल्या असहयोग आंदोलनात आपला पूर्ण सहयोग दिला होता. त्यामुळे त्यावेळी त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. परंतु, वयाने लहान असल्या कारणामुळे त्यांना सोडून देण्यात आलं होत. याचप्रमाणे सन 1930 साली महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या सविनय अवज्ञा आंदोलनात सहभागी होवून त्यांनी सक्रीय भूमिका बजावली. महात्मा गांधी यांनी चालवलेल्या सविनय अवज्ञा आंदोलनाचा मूळ उद्देश हा देशांतील नागरिकांना इंग्रज सरकारला कर न देण्याबाबत जागृत करणे हा होता. त्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांनी या आंदोलनांच्या माध्यमातून आपले महत्वपूर्ण योगदान दर्शवित आपल्या भाषणाच्या माध्यमातून लोकांना कर न भरण्याचा सल्ला दिला. यावेळी सुद्धा त्यांना सुमारे अडीच वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. दुसर्या महायुद्धाच्या वेळी काँग्रेस पक्षाचे सदस्य भारताला स्वातंत्र्य घोषित करण्याच्या मुद्द्यावर अडून राहिले. त्यामुळे देशांत पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा मुद्दा पेटला. याकरिता काँग्रेसने जनआंदोलनाची स्थापना केली. या आंदोलनादरम्यान लाल बहादूर शास्त्री यांना ब्रिटीश सरकारने पकडून तुरुंगात कैद केले. सुमारे एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
अशाप्रकारे लाल बहादूर शास्त्री गुरु महात्मा गांधी यांच्या सोबत कायम त्यांच्या सावली सारखे सोबत राहिले. सन 1942 साली झाली महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध सुरु केलेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी होवून महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईत त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. या आंदोलनानंतर त्यांना अकरा दिवस भूमिगत रहावं लागलं होत. परंतु, यानंतर सुद्धा त्यांना इंग्रज सरकारने पकडले होते. यानंतर सन 1945 साली त्यांची सुटका करण्यात आली होती.
* लाल बहादूर शास्त्री यांचे राजनीतिक कौशल्य -
सन 1946 साली देशांत झालेल्या प्रांतीय निवडणुकांदरम्यान लाल बहादूर शास्त्री यांची प्रशासकीय व संघटन क्षमता पाहून पंडित गोविंद वल्लभ पंत इतके प्रेरित झाले की, ज्यावेळी पंत उत्तरप्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना आपले संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले. शास्त्री यांनी आपल्याला मिळालेल्या संसदीय सचिव पदाची कामगिरी योग्यरित्या पाडली. त्यामुळेच त्यांना गोविंद पंत यांच्या मंत्रिमंडळामध्ये जागा मिळाली. शिवाय, पोलीस आणि परिवहन मंत्री पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान शास्त्रींनी देशांतील महिलांची स्थिती सुधारणे व त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महिलांची वाहक पदी भरती करून, परिवहन विभागात महिलांकरिता आरक्षण लागू केले. आपल्या पदाचा योग्यरीत्या वापर करत त्यांनी पोलीस नियमात काही सुधारणा केल्या. जसे की, लोकांची गर्दी पांगवण्यासाठी पूर्वी काठीचा वापर केला जात असे. परंतु, लाल बहादूर शास्त्री यांनी हा नियम मोडीत काढत त्याऐवजी पाण्याची फवारणी करण्याचा नियम लागू केला.
तसेच देशात संविधान लागू केल्यानंतर आणि देश धर्मनिरपेक्ष व प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यानंतर देशांत सर्वसाधारण निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री काँग्रेस पक्षाच्या महासचिवपदी विराजमान होवून आपल्या पक्षाची धुरा सांभाळत होते. काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण पद आपल्याकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी सांभाळत आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचा मोठ्या प्रमाणात विजय मिळाला.
सन 1952 साली देशांत झालेल्या प्राथमिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांची देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना लाल बहादूर शास्त्री यांना रेल्वे आणि परिवहन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. आपल्या या पदाची जबाबदारी म्हणून त्यांनी रेल्वेतील प्रथम श्रेणी आणि तृतीय श्रेणी यांच्यात असणारे अंतर भरपूर प्रमाणात कमी केले. सन 1956 साली झालेल्या रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सरकार पुन्हा सत्येवर आल्यानंतर त्यांना परिवहन आणि संचार मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, यानंतर त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळला. सन 1961 साली गृहमंत्री पदावर कार्यरत असताना गोविंद वल्लभ पंत यांचे निधन झाले. परिणामी या पदाची धुरा लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे सोपवण्यात आली. गृहमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या सुरक्षे संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. सन 1962 साली झालेल्या भारत चीन युद्धा दरम्यान त्यांनी देशांतर्गत सुरक्षा कायम राखण्यात महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
* लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान म्हणून -
सन 1964 साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अपघाती निधन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा राजनीतिक इतिहास पाहता पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती केली. ज्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान पदी नियुक्ती केली गेली त्यावेळेस देश अनेक बिकट संकटाचा सामना करत होता. सन 1965 साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या वेळी त्यांनी आपल्या कुशल रणनीतीच्या बळावर देशात शांतता कायम ठेवली.
* लाल बहादूर शास्त्री यांचा ‘जय जवान जय किसान नारा’ -
लाल बहादूर शास्त्री जेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. तेव्हा देशात खूप बिकट परिस्थिती पसरली होती. त्यावेळेस देशात खाण्या-पिण्याच्या गोष्टी आयात केल्या जात. याकरिता आपला देश नॉर्थ अमेरिकेतून येणार्या धान्यावर पूर्णतः अवलंबून होता. भारत पाक युद्धाच्या वेळी देशांत सर्वत्र कोरडा दुष्काळ पडला होता. लोक अन्नपाण्यासाठी त्रासून गेले होते. देशातील लोकांची परिस्थिती पाहता शास्त्री यांनी देशांतील लोकांना एका दिवसाचा उपवास पकडण्याची विनंती केली. तसेच लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘जय जवान जय किसान’ हा बहुमुल्यू नारा दिला. जो कालांतराने खूप प्रसिद्ध झाला.
* लाल बहादूर शास्त्री यांचे निधन -
सन 1966 साली भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शांततेचा करार हस्ताक्षरीत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांना रशियाची राजधानी ताश्कंद येथे भेटले. यावेळेस भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक मुख्य मुद्यांवर हस्ताक्षर करण्यात आले. शांततेचा करार हस्ताक्षरीत करण्यात आल्याच्या रात्री म्हणजे सन 11 जानेवारी, 1966 साली लाल बहादूर शास्त्री यांचे रहस्यमय निधन झाले. लाल बहादूर शास्त्री यांचे निधन रात्री झाल्याने लोकांनी त्यांच्या निधनाचे अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावले. काही लोकांच्या मते त्यांचा मृत्यू षडयंत्र रचून त्यांचा खून करण्यात आला. तर काहींच्या मते, त्यांना विष देण्यात आलं. तसेच काही लोकांचे असे मत आहे की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला. अशाप्रकारचे नाना तर्हेचे अनेक विचार लोकांनी त्यांच्या मृत्यूबद्दल केले आहेत. परंतु, आजपर्यंत त्यांच्या निधनाचे रहस्य कोणालाच उलघडले नाही.
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबद्दल विशेष बाब म्हणजे त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले गेले नव्हते. लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललिता यांनी आपले पुस्तक ‘ललिता के आंसू’मध्ये शास्त्रींच्या निधनाची खूपच भावनात्मक व्याख्या केली आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या पतींना विष देऊन मारले असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याचबरोबर त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांच्या निधनाचे गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना यश आले नाही. आजपर्यंत लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू एक गूढ रहस्य बनून आहे. लाल बहादूर शास्त्री हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांचा मृत्यू सातसमुद्रापार विदेशी भूमीवर झाला आहे. त्यांच्या आठवणीत दिल्ली येथे विजयघाटाची निर्मिती करण्यात आली आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांची नियुक्ती करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री एक निष्ठावंत, सत्यवादी, कार्यकर्ते होते. तसचं महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अहिंसेचे पुजारी होते. त्यांचे असे म्हणने होते की, ‘‘हिंसा किंवा असत्याच्या मार्गाने खरी लोकशाही व स्वराज्य कधीच मिळवता येत नाही.’’
* लाल बहादूर शास्त्री यांना मिळालेले पुरस्कार -
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण कामगिरी पार पडून स्वत:ची विशेष ओळख निर्माण करणारे देशप्रेमी व इमानदार राजनेता लाल बहादूर शास्त्री यांना सन 1966 साली त्यांच्या मरणोपरांत भारतातील सर्वोच्च पुरस्कारा भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता अनेक आंदोलनांमध्ये सहभागी होवून इंग्रज सरकारला पछाडून टाकले होते. त्याकरिता त्यांना अनेकवेळा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता. त्यांची स्वातंत्र्य लढ्यातील कारकीर्द थोर स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे होती. त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्री यांनी एक राजनेता म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमता आणि तर्कज्ञानाच्या बळावर संकटा प्रसंगी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशाचे संरक्षण केले. त्यांनी आपल्या राजनीतिक जीवनात देशाला हरित क्रांती आणि औद्योगिकीकरणाच्या मार्गावर नेलं.
लाल बहादूर शास्त्री यांच्या सारख्या महान क्रांतीकार व कुशल राजनेत्याने आपल्या देशात जन्म घेतला हे आपलं भाग्याचं समजावं लागेल. त्यांनी आपल्या देशाकरिता दिलेले बलिदान आपण भारतीय नागरिक कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळेच आज आपण देशात मुक्त संचार करू शकतो. खरेच लाल बहादूर शास्त्री यांच्या सारखा राजनेता पुन्हा होणे नाही. त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितले होते की, देशाप्रती आमचा रस्ता सरळ आणि स्पष्ट आहे. आमच्या देशांतील प्रत्येक व्यक्तींना स्वातंत्र्य आणि समृद्धीसोबतच समाजवादी लोकतंत्राची स्थापना करणे आणि जगातील सर्व देशांसोबत विश्व शांती आणि मित्रतेचे संबंध राखणे.

jay hind
ReplyDeletenice mahiti
ReplyDeletenice one
ReplyDeletegood info
ReplyDelete