बेलापुर ग्रामस्थांच्यावतीने प्रा.डॉ.अब्दुस सलामसर यांचा सत्कार
शाळा व विद्यार्थ्यांची झालेली प्रगती पाहून समाधान - प्रा.डॉ.अब्दुस सलाम सरनगर - अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या बेलापुर, ता.श्रीरामपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूलला 25 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल गावकरी व समाज बांधवांच्यावतीने संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा.शेख अब्दुस सलाम सर व फरीदाभाभी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक जाकीर सर, हुमा, अलमास, अबुबकर सर, समितीचे अध्यक्ष जावेदभाई, इमाम जनाब, अनीस जनाब, हाजी चाँदसाहब आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना प्रा.डॉ.सलाम सर म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने आपण बेलापूर सारख्या ग्रामीण भागात 25 वर्षापूर्वी शाळेची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामस्थ व समाज बांधवांच्या सहकार्याने आज शाळेचा झालेला विस्तार आणि शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांची झालेली प्रगती पाहून समाधान वाटते. आता यापुढील काळात तंत्रज्ञान युगाचा विचार करुन तांत्रिक शिक्षणाचे छोट-छोटे कोर्स सुरु करुन मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आपला प्रयत्न आहे. यात नेहमीप्रमाणे सर्वजण साथ देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मोहसीन, जाफरभाई आतार, इमाम जनाब यांनी आपल्या मनोगतातून प्रा.अब्दुस सलाम सर यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानाचा आढावा घेतला. याच कार्यक्रमात इ.10 वी मधील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला तर सन 2021 मध्ये इ.10 वीत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हाजी चॉदसाहब यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सारी रईस सर यांनी केले तर अनीस जनाब यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ, समाज बांधव, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
