हिजाब संदर्भात सुरु असलेल्या वादंगाबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप
करुन दोषींवर कारवाई करावी- डॉ.कमर सुरुर
नगर - गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यात ‘हिजाब’वरुन सध्या सुरु असलेल्या वादाबाबत केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करुन हे वादंग थांबवावे. देशाच्या घटनेने भारतातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य, खान-पान, राहणे, कपडे घालणे आदिंबाबत व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. तरी सुद्धा ‘हिजाब’सारखे विषय चर्चेत आणून काही विघातक बुद्धिची माणसे समाजा-समाजात जातीय तेढ निर्माण करुन देशाच्या राष्ट्रीय एकत्मियतेला दुषित करण्याचे काम करत आहेत. अशा लोकांवर सरकारने स्वत: हस्तक्षेप करुन अशा कृत्य करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मखदुम सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरुर यांनी जिल्हाधिकार्यां मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
‘हिजाब’ घालणे संविधानाच्या कलम 19 (1) (अ) अंतर्गत मुलभुत हक्कही आहे. तो खाजगी जीवनाच्या हक्काचा एक पैलू आहेत. त्यास सुप्रिम कोर्टाने कलम 21 चा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे. अशा घटनेमुळे देशात सर्वत्र कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे अशा समजाविघातक कृत्य करणार्यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास अशा घटना पुन्हा होणार नाही. याची काळजी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
