स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बहादुर शाह ज़फ़र, सर सैय्यद अहमदखान व शहीद अशफाकुल्लाह खान यांना अभिवादन
'गंगा जमनी तहजीब' हीच भारताची खरी संस्कृती, या सर्वांच्या एकत्रित संघर्षामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले- काॅ.प्रा.डाॅ.महेबुब सैय्यदअहमदनगर- आपल्या प्रिय भारताची जडणघडण ही प्राचीन काळापासुन सर्वसमावेशक स्वरूपाची झालेली आहे. शक, कुशाण, हूण, आर्य या सारख्या अनेकांना सामावुन घेतले आहे. त्यानंतर पारशी, इसाई, इस्लाम यासारखे अनेक धर्म संस्कृती येथे आल्या, एकजीव झाल्यात, एकजुटीने राहतात. याच सर्वधर्मसमभावी मनोवृत्तीच्या स्वातंत्र्यविरांनी इंग्रजांपासुन भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिले.असे प्रतिपादन काॅ.प्रा.डाॅ.महेबुब सैय्यद यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अॅड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सेनानी बहादुर शहा जफर, सर सय्यद अहमद खान व शहीद अश्फाक उल्ला खान यांची संयुक्त जयंती रहमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, अहमदनगर येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्रा.डॉ. मेहबूब सय्यद बोलत होते. याप्रसंगी रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूस भाई तांबटकर, काॅ.भैरवनाथ वाकळे,मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीदखान दुलेखान, सचिव डॉ. कमर सुरूर, रामदास वाघसकर सर,मुस्कान फाउंडेशनचे अध्यक्ष शफाकत सैय्यद, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ खान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष अरिफ सय्यद, तसेच नादिर खान, तारीक शेख, जावेद मास्टर आदी उपस्थित होते.
इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ खान म्हणाले, बहादूर शाह ज़फ़र यांच्या एक शद्बावर त्यावेळी लाखो लोक एक दिलाने इंग्रजाविरुद्ध लढण्यास तयार झाले. मात्र काही गद्दारांनी बहादूर शाह जफर यांच्याबरोबर गद्दारी करुन इंग्रजांच्या बाजूने साथ दिल्याने बहादूर शाह जफर यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना अटक करुन संपूर्ण कुटूंबासहीत काळ्या पाण्याची शिक्षा दिली. व त्यांच्या तीनही मुलांचे मुंडके छाटून व ते ताटात सजवून बहादूर शाह जफर यांना भेट दिले. तरी ते म्हणाले की, देशावर प्रेम असणार्यांची मुलं अशाच पद्धतीने समोर येतात. त्यांना रंगुन येथे बंदीस्त ठेवण्यात आले होते. चार वर्षानंतर तेथेच त्यांचे निधन झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या शौर्याची जाण ठेवून आझाद हिंद सेनेची स्थापना त्यांच्या कबरीवर शपथ घेऊन केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, देश स्वतंत्र झाल्यावर बहादूर शाह यांच्या इच्छेनुसार त्यांची ही कबर येथून हिंदूस्थानात नेली जाईल. दुर्दैवाने ते अजूनही शक्य झाले नाही.
कवियत्री डॉ.कमर सुरुर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की पारंपारिक मदरसा प्रणित शिक्षण व्यवस्था आणि ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात आलेली चर्चप्रणित शिक्षण व्यवस्था यातील संघर्षात पारंपारिक मदरसाप्रणित शिक्षण व्यवस्थेला आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचे महत्वपूर्ण कार्य सर सय्यद अहमदखान यांनी पार पाडले. म्हणूनच डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.जाकीर हुसेन सारखे राष्ट्रपती याच मदरसा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होऊ शकले. त्यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला. त्यांनी मध्ययुगीन भारतातील चाळीसपेक्षा जास्त अरबी, फार्सी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे केली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे.
नवीन पिढीला काहीही न करता फुकटात स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्यांना देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांविषयी फार आकर्षण राहिलेले नाही व आज शाळेमध्ये जो थोडाफार इतिहास शिकवला जातो, त्यामुळे त्यांना थोडेफार काही स्वातंत्र्यसेनानी आठवतात. घरातल्या मोठ्यांकडून त्यांना कधीच स्वातंत्र्यसेनानींबद्दल सांगितले जात नाही, म्हणून आजची युवा पिढी शहिदांना विसरत चालली आहे. शहिदांची जयंती-पुण्यतिथी साजरी केल्याने शहिदांच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण होते. शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वात कमी वयाचे स्वातंत्र्य सेनानी होते, असे रहेमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास वागसकर यांनी केले. तर प्रास्ताविक तारिक शेख यांनी केले. आभार जावेद मास्टर यांनी मानले.
