अल करम हाॅस्पिटलच्या रक्तदान शिबीरात 92 जणांचे रक्तदान
नि:स्वार्थ केलेले दान निश्चितच समाजाच्या हिताचे- आ.संग्राम जगताप
नगर - आज समाजात कृतीतून सामाजिक काम करण्याची गरज आहे. गरजवंतांची गरज ओळखून केलेली मदत ही कायमस्वरुपी लक्षात राहत असते. नि:स्वार्थ केलेले दान हे निश्चितच समाजाच्या हिताचे असते. रक्तदान हेही असेच दान आहे. आपण दिलेले रक्त कोणाला दिले जाईल, याची माहितीही आपणास नसते, परंतु याच रक्तामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होत असल्याने यासारखे पुण्यकर्म नाही.अल करम हाॅस्पिटलच्यावतीने नेहमीच असेच समजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येत असतात. त्यामुळे समाज जोडण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अल करम हाॅस्पिटल, सोनोग्राफी सेंटर अँणड मेटरनिटी नर्सिंग होमच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते. यावेळी हाजी शौकत तांबोली, मुजाहिद करैशी (भा), नगरसेवक समद खान, डॉ.जहीर मुजावर, समीर सैयद, तैसिफ रेडियम ,सगीर तंबोली,इमरान शेख़, शेर अली , शोएब शेख, सैफ्फुदिन शेख, एजाज़ तंबोली आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविकात तौफिक तांबोली म्हणाले, संस्थेच्यावतीने मागील दहा वर्षांत नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. सध्याच्या कोरोना व लसीकरणामुळे रक्ताचा तुटवडा भासत असतांना युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करुन या शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीरास नेहमीच चांगले प्रतिसाद मिळते. यापुढेही असेच समाजिक उपक्रमांना प्राधान्य देऊ, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेर अली यांनी केले तर आभार तौसिफ रेडियम वाला यांनी मानले. या शिबीरात 92 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तसंकलनाचे कार्य सिव्हिल हाॅस्पिटलच्या रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
