स्त्रीचे माणूसपण स्वीकारण्यात आपली लोकशाही अपयशी - किरणताई मोघे

स्त्रीचे माणूसपण स्वीकारण्यात आपली लोकशाही अपयशी - किरणताई मोघे

लोकशाही उत्सवातील व्याख्यानाचे चौथेसत्र


अहमदनगर - अमृत महोत्सवाकडे प्रागतिक वाटचाल करणाऱ्या आपल्या भारतीय लोकशाहीतील समानता, स्वातंत्र्य, एकमेकांच्या वेगळ्या मताबद्दल आदरभाव, एकमेकांप्रती बंधुभाव या मूल्यांचे संवर्धन करत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे असे मत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा किरणताई मोघे यांनी मांडले. लोकशाही उत्सवाच्या चौथ्या सत्राला संबोधित करताना, या मुल्यांसोबतच भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय सहभागाबद्दल देखील यापुढे पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.


' भारतीय लोकशाही आणि स्त्रिया ' या विषयाची मांडणी करताना ,भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांचे आजच्या लोकशाहीतील प्रतिनिधित्व स्वीकारले गेले आहे . तरीही अजूनही दैनंदिन जीवनात विशिष्ट प्रतीकात्मक पेहेराव आणि उपभोगाची वस्तू यापलीकडे स्त्रीचं ' माणूसपण ' स्वीकारण्यात लोकशाही म्हणून आपण अपयशी ठरत असल्याची खंतही किरण ताई यांनी व्यक्त केली.
लोकशाहीकडे केवळ राजकीय व्यवस्था म्हणून न पाहता, ती अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी सुदृढ मानसिकतेच्या सामाजिक व्यवस्थेची मजबूत बांधणी आवश्यक आहे. त्यासाठी जाती- धर्माधिष्ठित स्तरिकरणासोबतच आर्थिक विषमता कमी करण्याचा सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे असे मत त्यांनी मांडले.


स्त्रीच्या मागासलेपणाला केवळ जातीव्यवस्था, पितृसत्ताक कुटुंब पद्धती, राजकीय व्यवस्थाच नव्हे तर विविध समाज घटकांतील स्त्रियांतर्गत स्तरिकरणदेखील पूरक ठरल्याची मांडणी त्यांनी केली. स्वतंत्र मतदानाच्या हक्कानंतरही विविध क्षेत्रातील स्त्रीच्या निर्णप्रक्रियेला कुटुंबापासून - संसदेपर्यंत सर्वत्र प्रभावित केले जाते. त्यामुळे जन्मापासूनच संघर्ष वाट्याला आलेल्या भारतीय स्त्रीच्या लोकशाहीतील एकूणच प्रतिनिधित्वाबाबत समग्र सामाजिक सिंहावलोकनाची अपेक्षा व्यक्त करत किरण ताई यांनी विषयाचा समारोप केला.


सत्राच्या सुरुवातीला किरणताई मोघे यांचा कार्यपरिचय लोकशाही उत्सव समिती सदस्य प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी करून दिला. सत्राचे सूत्रसंचालन राष्ट्रसेवा दल सदस्य शिवाजीराव नाईकवाडी यांनी तर सत्राच्या वक्त्या किरणताई यांचे तसेच सत्राच्या आयोजनात महत्वाचे सहकार्य करणारे उत्सव समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, खजिनदार अशोक सब्बन, सचिव आर्की. अर्शद शेख, प्रा. अतुल चौरपगार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार समितीतील सदस्य सुरेखाताई आडम यांनीस्वरचित कविता वाचनातून मानले. सत्राचा समारोप बाल विद्यार्थिनींच्या संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!