Education : शिक्षणात जात, धर्म, प्रांत आणि भेदभाव नकोत : डॉ. प्रल्हाद लुलेकर

Education : शिक्षणात जात, धर्म, प्रांत आणि भेदभाव नकोत : डॉ. प्रल्हाद लुलेकर 

अकोले (अहमदनगर) : महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी भारतात खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया रोवला. सर्व समाजाच्या विरोधात उभी राहिलेली पहिली स्री म्हणजे सावित्रीबाई फुले होय. शिक्षणात जात, धर्म, प्रांत आणि भेदभाव नकोत जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस हाच क्रेंद्र मानून त्यांनी महान कार्य केले होते. असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहत्यिक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

अकोले येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या 48 व्या वार्षिक स्नेसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कायम विश्वस्त, माजी मंत्री, मधुकर पिचड होते. तर व्यासपीठावर संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, मधूकर सोनावणे, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, कार्यकारणी सदस्य डॉ. दामोदर सहाणे, शरद देशमुख, रमेश जगताप, संपत मालुंजकर, डॉ. प्रशांत तांबे, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ साहत्यिक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले, महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील महामानव संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. या सर्व महामानवांनी आधुनिक भारताचे स्वप्न पाहीले होते, खरे शिक्षणतज्ज्ञ होते कारण त्यांनी आधुनिक भारत घडविण्यासाठी स्वतः अभ्यासक्रम तयार करून, स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले. शिक्षणात जात, धर्म, प्रांत येता कामा नयेत तसेच भेदभावही  होता कामा नये, तर शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज आहे. आज आपल्याला राजकीय समता  मिळाली पण आर्थिक-सामाजिक समतेचे काय ? असा प्रश्न उपस्थित करून हा देश राजकीय पक्षांचा नसून लोकांचा आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय संविधान आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दल विविध पैलू मांडले.

No caste, religion, region and discrimination in education Dr. Prahlad Lulekar

अध्यक्षस्थानी भाषणात बोलताना पिचड म्हणाले की, देशातील स्त्रियांचा गौरव झाला पाहिजे. तालुक्यातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि आज शिक्षण घेणाऱ्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या वाढली हे समाधानकारक आहे. 1974 साली स्थापन झालेली संस्था लवकरच सुवर्ण वर्षात पदार्पण करत असून, संस्था स्थापनेचा तत्कालीन धुरीणांचा उद्देश सफल झाला आहे.

यावेळी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या प्राध्यापक आणि वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावर्षीचा बेस्ट स्टुडंट्स ऑफ दी इयर वरिष्ठ विभात शुभम दातखीळे याला, तर कनिष्ठ विभागात श्रावणी चासकर हिला प्रदान करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार अनिकेत जाधव, गुणवंत कर्मचारी परेश पाटेकर यांना देण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, स्वागत प्राचार्य डॉ.शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.संदेश कासार, डॉ.महेजबिन सय्यद, डॉ.नितीन आरोटे, किशोर धुमाळ यांनी केले आभार प्रा.चांगदेव डोंगरे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.